वाहून जाणाऱ्या पाण्याला चालायला, चालणा-या पाण्याला थांबायला अन् थांबलेल्या पाण्याला जमीनीत मुरवणे काळाची गरज- प्राचार्य डॉ. वसंत बिरादार
अहमदपुरच्या महात्मा फुले महाविद्यालयात ‘जागतिक जल दिन’ साजरा
अहमदपूर (गोविंद काळे) : वाहून जाणाऱ्या पाण्याला थांबवा… थांबलेल्या पाण्याला चालायला लावा… अन् चालणा-या पाण्याला जमीनीत मुरवणे ही काळाची गरज असल्याचे नमूद करून भविष्यात पाण्याची समस्या लक्षात घेता अपव्यय न करता प्रमाणात पाण्याचा वापर करणे हे आवश्यक असून पुरुषांबरोबरच महिलांनाही जल साक्षर करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले महाविद्यालयाचे पर्यावरणवादी प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांनी केले.
येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या ‘ग्रीन क्लब’ व ‘भूगोल विभागाच्या’ वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘जागतिक जल दिन’ कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष माधवराव पाटील हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा पंचायत समिती अहमदपूर च्या अनुजैविक तज्ज्ञ श्रीमती एस के चव्हाण यांची उपस्थिती होती. तसेच विचार मंचावर उपप्राचार्य डॉ.दुर्गादास चौधरी, कार्यक्रमाचे संयोजक डॉ. दिगंबर माने आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलतांना प्राचार्य डॉ . वसंत बिरादार पाटील म्हणाले की, चांगल्या आरोग्याचा मार्ग पोटातून जातो. त्यासाठी शुद्ध पाणी वेळेवर पिणे आवश्यक आहे. पाण्यामुळे जवळपास ९०% आजार होतात म्हणून आपण जे पाणी पितो ते पाणी शासनाने निर्माण केलेल्या वेगवेगळ्या प्रयोगशाळेतून तपासून घेणे आवश्यक आहे. तसेच छताचे पाणी जमिनीत, गावचे पाणी गावात तर; शेतातील पाणी शेतातच जिरवले पाहिजे. भविष्यात पैशांच्या बँके सारखी पाण्याची बँक निर्माण झाली तर आश्चर्य वाटण्याचे कुठलेही कारण नाही.ते दिवसही जवळ आलेले आहेत, असेही ते म्हणाले.
जागतिक जल दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात पाणी आडवा – पाणी जिरवा ही योजना राबवून ‘सुंदर महाविद्यालय, स्वच्छ महाविद्यालय व हरित महाविद्यालय ‘ निर्माण करण्यात आपले योगदान देणाऱ्या महाविद्यालयातील कार्यालय प्रमुख प्रशांत डोंगळीकर यांना ‘जल नायक ‘ , वामनराव मलकापूरे यांना ‘जल रक्षक’, शिवाजी चोपडे यांना ‘जल दूत’ व चंद्रकांत शिंपी यांना ‘जल मित्र ‘ पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी जल तज्ज्ञ श्रीमती एस. के. चव्हाण यांनी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे संयोजक डॉ. डी. एन. माने यांनी केले व सूत्रसंचालन ह.भ.प. प्रो.डॉ. अनिल महाराज मुंढे यांनी केले तर आभार डॉ. सचिन गर्जे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.