उन्हाळी शिबिरातून व्यक्तिमत्व विकासाचे पैलू पडावेत – नंदा कोणे (स्वामी)

0
उन्हाळी शिबिरातून व्यक्तिमत्व विकासाचे पैलू पडावेत - नंदा कोणे (स्वामी)
उन्हाळी शिबिरातून व्यक्तिमत्व विकासाचे पैलू पडावेत - नंदा कोणे (स्वामी)

उदगीर (प्रतिनिधी) सद्यस्थितीत उन्हाळी शिबिरे अत्यंत आवश्यक झाली आहेत. मध्यंतरीच्या काळामध्ये ऑनलाईन अभ्यासाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना मोबाईल हाताळणे कळाले आहे. त्यामुळे मोबाईल मधील माहितीच्या महाजाळामध्ये विद्यार्थी अडकू लागले आहेत. सुरुवातीला केवळ खेळ म्हणून पालक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, मात्र विद्यार्थ्यांनी जास्त वेळ मोबाईल हाताळणे त्याच्या आरोग्यासाठी, डोळ्यासाठी अत्यंत घातक आहे. ही विद्यार्थ्यांची सवय मोडीत काढण्यासाठी उन्हाळी शिबिरांचे आयोजन केले जाते. ज्या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी नुसार त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू पाडत पाडत तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करत असतात. अशा शिबिरातून खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. अशी अपेक्षा विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेतील तज्ञ शिक्षिका नंदा कोणे (स्वामी) यांनी व्यक्त केली आहे.
त्या उदगीर येथील पद्मिनी संगीत विद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार एल.पी.उगीले, राहुल कदम, बालाजी सैना, शंकर साळुंखे, प्रार्थना जाधव, मेघाली जाधव, संतोष खाडे, माधुरी बिरादार, कल्पना कोयले, यांच्यासह संयोजिका दीपिका पाटील, रत्नाकर पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना नंदा कोणे म्हणाल्या की, अशा शिबिरामध्ये विद्यार्थी रमतात. कारण मातीकाम, रंगकाम, चित्रकला, बुद्धिबळ, संगीत, गायन, वादन, पोहणे अशा विविध कलेतून विद्यार्थ्यांचे मनोरंजन तर होतेच होते, त्यासोबतच आपण काहीतरी नवीन शिकत आहोत. ही जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण होत असल्याने ते आवडीने हे सर्व करायला लागतात. शिवाय उन्हाळी शिबिरामुळे त्यांना काही काळ का होत नाही, मोबाईल पासून दूर ठेवता येते. अगदी लहान वयातच सतत मोबाईल हाताळल्यामुळे डोळ्याचे आजार वाढत असल्याची भीती डोळ्याचे तज्ञ डॉक्टर व्यक्त करत आहेत. त्यामुळे पालकांनी या गोष्टीचे गांभीर विचारात घेणे गरजेचे आहे. असेही सांगितले.
संयोजिका दीपिका पाटील यांनी प्रस्ताविक भाषणातून या उन्हाळी शिबिरामध्ये आपण काय काय शिकवणार आहोत? आणि पालकांनी यामध्ये कसा सहभाग नोंदवावा. या संदर्भात आवश्यक माहिती सांगितली. या संगीत विद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध संगीत साहित्य आणि वाद्य हाताळायला मिळणार आहेत, तसेच विविध नवीन नवीन खेळही शिकता येणार आहेत. त्यामुळे याचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन दीपिका पाटील यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन रमाकांत पाटील यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *