वृक्षारोपण ही कृषीविश्वातील चळवळ बनावी – प्राचार्य डॉ. ए. पी. सूर्यवंशी
उदगीर (एल. पी. उगिले) : वृक्षारोपण ही काळाची गरज बनली आहे. कृषी विश्वात काम करणाऱ्या सर्वांनीच त्याचे गांभीर्य विचारात घेणे गरजेचे आहे. विशेषतः कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवड ही एक चळवळ म्हणून काम करणे गरजेचे आहे. असे विचार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठासी संलग्न असलेल्या उदगीर तालुक्यातील कृषी महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा येथील प्राचार्य डॉक्टर ए.पी. सूर्यवंशी यांनी जागतिक पर्यावरण सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
याप्रसंगी “आपली जमीन, आपले भविष्य” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य सूर्यवंशी बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, जमीन व झाडे यांचा शेतकरी आणि कृषी खात्याशी संबंधित सर्व घटकांचा जिव्हाळ्याचा संबंध असल्याचे विशद केले. राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे स्वयंसेवक वृक्ष लागवड करतातच परंतु केवळ औपचारिकता म्हणून वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन न होता ती एक लोक चळवळ बनणे गरजेचे आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून सर्वांनाच वृक्षारोपणाची गोडी निर्माण होईल अशा पद्धतीचे संस्कार त्यांच्यावर देणे गरजेचे आहे. वृक्षसंपदा ही सजीवांना मिळालेली अनन्य साधारण अशी मोठी देणगी आहे. त्यामुळे पृथ्वीतलावर वृक्षांच्या संख्येत वाढ होणे, वृक्ष संवर्धन करण्याची विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे गरजेचे आहे. असेही सूर्यवंशी यांनी सांगितले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे रामचंद्र खंडागळे यांनी देखील पर्यावरणाचे बिघडलेले असंतुलन बदलून निसर्गचक्र पूर्ववत सुरू ठेवायचे असेल तर वृक्षा शिवाय पर्याय नाही. सद्यस्थितीत कोरडवाहू शेतीला जो फटका अवकाळी पाऊस आणि पावसाळ्यामध्ये पावसाची उघडीप होणे यामुळे होत आहे. त्यासोबतच ग्लोबल वार्मिंग मुळे पुढील पिढीचे होणारे नुकसान टाळायचे असेल तर शाश्वत विकासाचा विचार करून वृक्षारोपण करावे, असे सांगितले.
याप्रसंगी कृषी महाविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आनंद दापकेकर यांनी देखील मानवी जीवन आणि वृक्षारोपण हे कसे एकमेकावर अवलंबून आहेत, हे सांगताना पर्यावरणाचा असमतोल मानवी हव्यासापोटी होत आहे, मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड थांबली पाहिजे. आणि प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून वृक्षारोपण करावे, असे सांगितले.
या प्रसंगी कृषी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनाची जबाबदारी घेतली. याप्रसंगी कृषी महाविद्यालयाचे संचालक गंगाधररावजी दापकेकर, स्वयंसेवक म्हणून काम करणारे अल्ताफ शेख, सुरज लंगोटे, समर्थ जगताप, अर्जुन खिल्लारे, राज डिसले, गायत्री गावंडे, मुक्ता वाडीवाले, अनुराधा लोंढे इत्यादी विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन खंडागळे यांनी केले.