समाज परिवर्तन करणे हेच साहित्याचे अंतिम उद्दिष्ट – प्रा. डॉ. गौरव जेवळीकर
उदगीर : (एल.पी.उगीले) लेखक आणि वाचक यामधील दुवा म्हणून पुस्तक काम करत असते. साहित्यातून जगण्याची प्रेरणा मिळते. साहित्य समाजाला दिशा देण्याचे काम करते. महापुरुषांना चिरंजीव करण्याचे काम देखील साहित्यच करत असते. समाज परिवर्तन करणे हेच साहित्याचे अंतिम उद्दिष्ट असते, असे मत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील लोकप्रशासन विभाग प्रमुख प्रा. डॉ. गौरव जेवळीकर यांनी व्यक्त केले. ते अक्षरमुद्रा प्रकाशनाच्या वतीने बाल वाचनालय, नगरेश्वर मंगल कार्यालय, उदगीर येथे आयोजित ‘साहित्य संवाद’ या उपक्रमातील पहिले पुष्प गुंफताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के हे होते. यावेळी व्यासपीठावर आर्य वैश्य ऑफिशियल अँड प्रोफेशनल असोसिएशनचे अध्यक्ष प्रा.संजय चन्नावार हे होते.
पुढे बोलताना डॉ. जेवळीकर म्हणाले, साहित्यातून सकारात्मकता निर्माण होते. विविध विषयावरचे ग्रंथ वाचन केल्यामुळे व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळते, हे सांगत असताना त्यांनी यशवंतराव चव्हाण, रवींद्रनाथ टागोर, शांता शेळके, पु. ल. देशपांडे यासारख्या विविध साहित्यिकांचे दाखले दिले. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. मस्के म्हणाले, हरवत चाललेले माणूसपण पुन्हा निर्माण करण्याकरिता साहित्य चळवळ निर्माण झाली पाहिजे. त्याचाच एक भाग म्हणून अक्षरमुद्रा प्रकाशनाच्या वतीने ‘साहित्य संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे मत व्यक्त करून त्यांनी आयोजकाचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षरमुद्रा प्रकाशनाचे संपादक डॉ. दीपक चिद्दरवार यांनी तर पाहुण्यांचा परिचय महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. कोंडीबा भदाडे यांनी तर आभार डॉ. मल्लेश झुंगास्वामी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी उदगीर व परिसरातील साहित्यप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.